Thursday 1 April 2021

उत्तम प्रशासक आणि गुरु

“उत्तम प्रशासक आणि गुरु”

 आदरणीय

 भारद्वाज सर,

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, हिंगोली.


“आपल्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा”

“बुडत्या सूर्याला पाहून अंधार झाला, रात्र झाली, आता भयान काळोख पसरणार अशा विचारांनी भयभीत न होता रंगांची उधळण करीत सकाळी सूर्योदय होणार आहे. अंधार सरणार आहे. अवघी चराचर सृष्टी प्रकाशात न्हाऊन निघणार आहे. निराशेचा खेळ संपवून, आशेची पाखरे आकाशात झेपावणार आहेत. असा विचार करून होणाऱ्या सूर्यादयाची उस्फूर्तपणे वाट पाहणारे, उत्साही व्यक्तिमत्व” म्हणजे पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य भारद्वाज सर होय.

 सर एकूणच तुमच्या कार्याविषयी बोलायचे झाले तर तुमचं व्यक्तिमत्त्व मोरासारखं आहे जसा मोर आपल्या पिसार्‍याच कौतुक स्वतः कधीच करत नाही, दुसरे त्याची योग्यता ओळखतात, कौतुक करतात, तसेच तुमच्या बाबतीत घडत जात आहे. कोणत्याही संघटनेच्या प्रमुख प्रशासकाच्या अंगी औदार्याची भावना म्हणजे मनाचा मोठेपणा असल्याशिवाय संघटना यशस्वी होऊ शकत नाही ही कुठलीही राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी नसताना हिंगोली सारख्या शहरात तुम्ही पाच वर्षात शाळा नावारूपाला आणली. हे शक्य झाले, ते तुमच्यातील अनंत शक्ती, असीम उत्साह, पराकोटीचे साहस आणि संयम त्याचबरोबर सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचे कौशल्य इतर सहकार्यातील गुणांचा शोध घेऊन त्यांना विकसित करून त्यांचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग करून घेण्याचे कौशल्य सर तुमच्या मध्ये आहे. त्यामुळेच तुम्ही इतक्या कमी वेळेत शाळेची पाळे-मुळे हिंगोली सारख्या मागास भागात रुजूवू शकलात म्हणूनच तुमच्या विषयी म्हणावेसे वाटते. “आयुष्याच्या सुंदर किनारीला तलम विचारांची आवश्यकता असते अशी विचारधारा जपणारी माणसंच असे यशाचे शिखर गाठू शकतात.” हे तुम्ही आणि तुमच्या सर्व शिक्षकवृंदानी यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोणत्याही संघटनेची रचना ही वरिष्ठ-कनिष्ठ स्तर अशा पद्धतीने करण्यात आलेली असते परंतु संघटना चालवत असताना सारासार विचार केला तर प्रत्येक पदावरील व्यक्ती व त्याचे कार्य महत्त्वाचे असते. कुणीही श्रेष्ठ कुणीही कनिष्ठ नसतो. याबाबतची जाणं ज्या प्रशासकाला असते तो उत्तम प्रशासक ठरतो ही जाणीव केवळ माणुसकीची जपणूक करणाऱ्या व्यक्ती मध्येच दिसून येते या संदर्भात स्वामी विवेकानंदांचे विचार अतिशय बोलके ठरतात. ते असे “जागृतीचा नवा मूलमंत्र ज्यांच्या अंतकरणात सतत तेवत राहतो त्यालाच माणुसकीची जपनूक करणारा माणूस म्हणावे”, हे विचार तुमच्या व्यक्तिमत्वाला लागू होतात. सर हा माणुसकीचा मूलमंत्र तुम्ही स्वतः पुरता मर्यादित न ठेवता तुमच्या टीम मधील प्रत्येक व्यक्तीत रुजवला आहे. त्याच बरोबर सर जो माणूस दोहोबाजूचा विचार करून शकतो, तो शांत, स्थितप्रज्ञ राहू शकतो. ही ‘स्थितप्रज्ञता’ तुम्ही स्वतः बरोबर शाळेतील प्रत्येक व्यक्तीमध्ये रूजवल्याचे दिसून येते. सर्वांना तुम्ही म्हणजेच तुमच्या संघटनेतील सदस्य बरोबरच आम्हा पालकांना देखील एक अतिशय महत्त्वाची बाब शिकवली आहे. ती म्हणजे “जिव्हाळ्याची माणसे मौल्यवान असतात. माणसं मिळवत मिळवत त्यांना बरोबर घेऊन जीवन प्रवास करायचा असतो.” हे तुम्ही तुमच्या वर्तनातून दाखवून दिले आहे. त्याचबरोबर सुसंवाद ही कला आहे. त्यासाठी आपले मन, विचार, कृती, उच्चार, निरोगी असणे आवश्यक असते.” हे कौशल्य देखील तुमच्या मनमोकळ्या स्वभावातून सिद्ध झाले आहे. कारण मन मोकळ्या स्वभावाची माणसेच उत्तम संवाद साधू शकतात. याचा प्रत्यय आम्हा सर्व पालकांना वारंवार आला आहे. मी प्रशासन शिकवते ते शिकवत असताना मी माझ्या विद्यार्थ्यांना आदर्श प्रमुख प्रशासक कसा असावा, हे सांगत असताना तुमचे उदाहरण देते. 

प्रमुख प्रशासकाच्या अगोदर तुम्ही एक शिक्षक आहात. एक शिक्षक म्हणून देखील तुमची भूमिका अतिशय उत्कृष्ट ठरली आहे. तुमचे आणि तुमच्या सर्व शिक्षकांचे मोठेपण तुमच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नजरेत ओतप्रोत भरलेले दिसून येते. आपल्या शिक्षकांसाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे विद्यार्थ्यांच्या हृदयातील आपली आदर्श प्रतिमा हा असतो. त्याची किंमत पैशात होऊ शकत नाही, तो पुरस्कार पाच वर्षात तुम्ही व तुमच्या टीममधील सर्व शिक्षकांनी मिळवला आहे. यातून हेच लक्षात येते, की “शिक्षकांचा मोठेपणा त्याला मिळणाऱ्या पैशांमध्ये नसून त्याची विद्वत्ता, शुद्ध चारित्र्य, निपक्षपाती स्वभाव व त्यांच्या बोधन शक्तीत असतो.” खरंच सर आपण फार भाग्यवान आहोत. आपण शिक्षक आहोत गुरु ही पदवी आपल्याला लाभलेली आहे. गुरू या शब्दाचा अर्थ फार व्यापक आहे. हे मी तुम्हाला सांगणे योग्य नाही कारण मी एक पालक म्हणून तुमच्या विषयी लिहित आहे, पण तुम्ही तो गुरू चा अर्थ सार्थ करून दाखवला आहे. तो असा गुरुंच्या अंगी व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंनी भरलेला सागरच हवा म्हणजेच “विचारांचे ऐश्वर्य, वाणीचे माधुर्य, व वृत्तीचे गांभीर्य ,मनाचे औदार्य, व्यवहाराचे चातुर्य इत्यादी गुणांनी युक्‍त असणारा गुरू विद्यार्थ्यांना आदर्श वाटतो.” तो आदर्श तुम्ही व तुमच्यातील सर्व शिक्षकांनी मुलांसमोर ठेवला आहे. आदरणीय सर मी एक पालक म्हणून माझ्या मुलाच्या संदर्भात अतिशय समाधानी आहे. तुम्ही माझ्या दोन्ही मुलांना “वेदांत” आणि “राजवर्धन” यांना पुस्तकी ज्ञानात तर उत्कृष्ट बनवले आहे, परंतु त्यांच्या सुप्त गुणांचा शोध घेऊन वेळोवेळी विविध कार्यक्रमात सहभागी करून घेऊन त्यांच्या कौशल्याचा देखील विकास केला आहे. भविष्यात ते कोणत्या पदावर जातील हे मी आज सांगू शकत नाही. परंतु एक उत्कृष्ट माणूस म्हणून समाजात ते आपले स्थान नक्कीच निर्माण करतील. असा केवळ विश्वासच नाही, तर मला आत्मविश्वास आहे. याचे सर्व श्रेय मी व माझे पती आदरणीय श्री. प्रभाकर माने “पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचे” प्राचार्य व अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत ज्या शिक्षकांनी माझ्या मुलावर स्वतःचे मूल समजून संस्कार केले, मूल्य संस्कारांचे धडे दिले त्यांना असेल, कारण सर तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेऊन हे कार्य केले आहे. मानवी जीवनात अंत:करणातून आपले हीत फक्त तीनच व्यक्तीला निस्वार्थ भावनेतून पाहत असतात. त्यामध्ये “आई” “वडील” आणि “शिक्षक” तुमचे सर्वांचे कार्य पाहून मला हा क्रम बदलावा वाटतो, प्रथम “शिक्षक” आणि द्वितीय स्थानावर “आई-वडील” हे सार्थक ठरेल. कारण घरातील आई फक्त एक किंवा दोन स्वतःच्या मुलांना घडवते परंतु शिक्षक मात्र नि:पक्षपातीपणे म्हणजेच जात, पात, धर्म, वंश, श्रेष्ठ-कनिष्ठ असा कुठलाही भेदभाव न करता विद्यार्थी घडवत राहतो. तुमच्या शाळेत तर हे आम्हाला प्रकर्षाने जाणवले. कारण पाच वर्षात तुम्ही विद्यार्थीच नाही, तर पालकांच्या संदर्भात देखील श्रीमंत-गरीब, पद, प्रतिष्ठा अशा कुठल्याच निकषावर भेदभाव केला नाही. सर्व पालक तुमच्यासाठी समान असे वेळोवेळी आम्हाला जाणवले. आमच्या प्रशासकीय अध्ययनात “हर्बट सायमन” यांनी “प्रशासकीय वर्तन” हा सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतात “प्रशासकीय प्रमुखाचे नि:पक्षपाती वर्तन अपेक्षित आहे. कारण प्रशासकीय प्रमुखांच्या वर्तनावरच संघटनेचे अस्तित्व अवलंबून असते.” या सिद्धांताचे तंतोतंत पालन सर केवळ प्राचार्य म्हणून तुमच्याकडूनच नव्हे. तर अगदी शेवटच्या स्तरावरील व्यक्तीकडूनही होताना आम्हाला अनुभवास येते. आदरणीय सर तुमच्या व्यवस्थापनाविषयी लिहिले तर फार मोठी कादंबरी तयार होईल. शब्ददेखील कमी पडतील पण जे जे अनुभव आले ते सरळ साध्या शब्दात व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला या पाठीमागे माझा कुठलाही स्वार्थ नाही. मला व माझ्या मिस्टरांना. आयुष्यात अगदी पहिलीपासून ते शेवटपर्यंत गुरु अतिशय उत्कृष्ट भेटले म्हणूनच आज आमचं आयुष्य सुखकर झाले. आजही त्यांच्याशी आमचे रिलेशन पक्के आहेत. माझ्या मुलांना देखील खूप चांगले गुरु लाभले आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांना तुमचा आशीर्वाद लाभावा एवढीच जाता-जाता आदरणीय प्राचार्य भारद्वाज सर व सर्व शिक्षकवृंदना प्रार्थना करते. गुरु संदर्भात दोन वेळी व्यक्त करते. 

“काय असतो गुरु”
लिहावा तर ग्रंथ आहे गुरु
वाचावा तर नशीब आहे गुरु
ज्याचा स्पर्श जाणवतो तो वारा आहे गुरु
अंबरातील अफाट आकाशगंगा आहे गुरु
सागरमाथ्याची उंची म्हणजे गुरू
सूर्याचे पहिले किरण आहे गुरु
लखलखीत चांदणं आहे गुरु
केली तर जादू आहे गुरु
गायली तर गझल आहे गुरु
विचार केला तर हवहवसं
वाटणारं स्वप्न देखील आहे गुरु
परमेश्वराने दिलेले एक वरदान आहे गुरु”

 शेवटी तुमच्या सर्व टीम साठी एवढेच म्हणेल 

“उल्हासित मने, प्रेरणादायी प्रत्येक कृती
अपार कष्ट आणि प्रगाढ आत्मविश्वास”

याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे “पोद्दार इंटरनॅशनल स्कूल” मधील प्रत्येक पदावरील व्यक्ती.

 लिखाण मराठीतून केलं पण सर आमचे शिक्षण मराठी माध्यमातून असल्याकारणाने आम्ही मराठीतूनच चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतो.‍लिहीत लिहीत काही चूक झाली असेल तर अंत:करणातून क्षमस्व. माझी मुले शाळेतून गेली तरी आपले ऋणानुबंध कायम राहतील अशी आपणा सर्वांकडून अपेक्षा करते व लिखाणास पूर्णविराम देते.

 आपली विश्वासू पालक

 प्रा. डॉ. माने सुरेखा प्रभाकर

(लोकप्रशासन विभाग प्रमुख)
कै.डॉ शंकरराव सातव कला व वाणिज्य महाविद्यालय, कळमनुरी. 


No comments:

Post a Comment