Wednesday 4 August 2021

गावोगावी उभारावे ज्ञानाचे एक मंदिर : सार्वजनिक ग्रंथालय




गावोगावी उभारावे ज्ञानाचे एक मंदिर : सार्वजनिक ग्रंथालय

  ---  चंद्रकांत नांगरे आणि सखाराम हारकळ 



जागतिक महासत्ता असलेल्या अमेरीकेचा सर्वांगीण विकास हा तेथील रस्त्याचे आणि ग्रंथालयाचे जाळे मोठ्या प्रमाणात विकसित करण्यात आल्यामुळे होत आहे. ग्रंथालयांना वर्ल्ड नॉलेज सेंटर म्हणण्यात येते. 21व्या शतकातील ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी ग्रंथालय अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. म्हणून भारतातील प्रत्येक गावा - गावात ज्ञानाचे मंदिर म्हणजे ग्रंथालय उभारले पाहिजे. आपल्या देशाचा, राज्याचा आणि गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ज्ञानदान देणाऱ्या ग्रंथालयाची समृद्धता, सर्जनशील कार्यक्षमता आणि सक्षमता वाढविण्याची गरज आहे.


किताबे मंजिल पर पहुंचाती है

हर जिज्ञासु को राह दिखाती है

किताबो में ज्ञान का सागर भरा है

जिंदगी की सबसे अच्छा दोस्त किताबे है I

म्हणूनच म्हटले जाते की ग्रंथ हे आपले मित्र, गुरु आणि मार्गदर्शक म्हणून सदैव आपल्याला साथ देतात. ग्रंथ हे माहिती, ज्ञान, शिक्षण आणि मानवी - सांस्कृतिक मूल्यांचे आदान -प्रदान करण्याचे कार्य करतात. ग्रंथ म्हणजे अनंत अडचणीच्या महाकाय सागरातून आपल्याला सुखाच्या काठावर सुरक्षित पोहचविणारे जहाज आहेत. अगदी प्राचीन काळापासूनच ग्रंथाचे महत्व सर्वांनीच मान्य केले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, एकनाथ आणि नामदेव यासारख्या महान संतांनी आपल्या ग्रंथातुनच समाज बांधणीचे कार्य केले होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषांनी आपल्या मौलिक ग्रंथातून वैचारिक क्रांती घडवून आणली, समाज परिवर्तन घडवून आणले. त्यांची ग्रंथसंपदा आजही आपल्याला प्रेरणा आणि मार्गदर्शन देतात.


दिसामाजी काहीतरी ते लिहावे

प्रसंगी अखंडित वाचीत जावे '

   या संताच्या म्हणण्यानुसार आपण दररोज ग्रंथ वाचावेत आणि नव -नवीन लिहीत राहावे. लहान मुलांनाही ग्रंथ वाचनाची गोडी लावावी. ग्रंथ वाचनाने त्यांना नव -नवीन माहिती मिळेल. त्यांच्यावर उत्तम सुसंस्कार पडतील. जीवनात कसे जगावे याचे ज्ञान मिळेल. पुढे हीच मुले लहान -लहान कविता आणि लेख लिहतील. मोठे कवी, लेखक, विचारवंत तसेच समाजातील सुसंस्कृत नागरिक बनतील.


जिथे ग्रंथ नाही तिथे ज्ञान नाही

जिथे ज्ञान नाही तिथे सौख्य नाही

ग्रंथालयावीण जो गाव राही

तिथे जीवना अर्थ काहीच नाही.

असे ना. शी. पोहनेरकर आपल्या ग्रंथबोध या ग्रंथातून म्हणतात.

भारतात प्राचीन काळी तक्षशीला आणि नालंदा यासारखी भव्यदिव्य, समृद्ध आणि ग्रंथसंपन्न ग्रंथालये होती. या ग्रंथालयात जगभरातील लाखो वाचक ज्ञान घेण्यासाठी येत असत. आजच्या अत्याधुनिक काळातही लाखो ग्रंथालये आपले ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करत आहेत. विद्यापीठ, शैक्षणिक, विशेष आणि सार्वजनिक ग्रंथालये आप - आपल्या वाचकांना वाचनीय साहित्याचे आदान -प्रदान करून ज्ञानाधिष्ठित समाज निर्मितीचे महतम कार्य करत आहेत. हे अभिमानाने सांगावेसे वाटते.


सार्वजनिक ग्रंथालय हे सामाजिक जीवनाचा अविभाज्य अंग आहेत. आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त माहितीच्या जगात माणूसपण टिकवण्यासाठी आणि माणसाला माणूस म्हणून प्रगल्भ करण्यासाठी ग्रंथालय संस्कृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. विद्यार्थी, शिक्षक, लेखक, कवी, साहित्यिक, डॉक्टर, वकील अश्या सर्वच स्तरातील लोकांसाठी सार्वजनिक वाचनालय ज्ञानकेंद्र बनले आहेत. ग्रंथालय हे ग्रंथ, वाचक, ग्रंथपाल आणि इमारत या चार घटकांवर अवलंबून असते. व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्वपूर्ण योगदान देत असते. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे साधन म्हणजे ग्रंथ होय.आजच्या आधुनिक युगात बौद्धिक विकासाचे शक्तिकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जा केंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालय सर्वोत्तम कार्य करू शकते. शिक्षण प्रसार, ज्ञान, माहिती आणि मनोरंजन यांचे शक्तीकेंद्र म्हणून 'सार्वजनिक ग्रंथालय' गावो- गावी विकसित करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक ग्रंथालये ही पुस्तकांचे ज्ञानाचे ऊर्जास्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहेत.लोकशाही वृद्धिंगत करणारे आणि सर्वसामान्यांना शिक्षण देणारे व्यासपीठ आहेत. सार्वजनिक ग्रंथालय आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत आहेत. धार्मिक अर्थाने पंढरपूर, तुळजापूर इ. तीर्थक्षेत्र आहेत तर सार्वजनिक ग्रंथालय वैचारिक तीर्थक्षेत्र आहेत. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ग्रंथालय हे देऊळ आहे. ग्रंथ हा देव आहे. वाचक हा भक्त आहे. ग्रंथपाल हा पुजारी आहे.  बाल, महिला, संशोधन ग्रंथालये हे ज्ञानापर्यंत पाहोचण्याचे झरे आहेत आणि ज्ञान हा प्रसाद आहे. असे सार्वजनिक ग्रंथालयाबद्दल म्हटले तर अतिशोयुक्ती ठरणार नाही. पण वास्तविक पाहता ग्रंथालय ही खरोखरच ज्ञानदानाचे आधुनिक तीर्थक्षेत्र आहेत.

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांना भारतासह जगातील सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेती, पर्यावरण, विज्ञान -तंत्रज्ञान यासह सर्व क्षेत्रातील विषयांची परिपूर्ण आणि आद्ययवत माहिती मिळावी यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून महाराष्ट्र सरकारने 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम, १९६७' मंजूर केला आहे. या अधिनियमान्वये राज्यातील नागरिकांच्या वाचन विषयक आवडीची जोपासना करणे आणि सार्वजनिक ग्रंथालय प्रणालीचा विकास करून 'गाव तेथे ग्रंथालय' हे घोषवाक्य टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. यासाठी ग्रंथालय सेवेच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून सरकार अंमलात आणत असते.

ग्रंथालय संचालनालय सार्वजनिक ग्रंथालयाच्या कामकाजावर देखरेख आणि नियंत्रण ठेवून नवीन सार्वजनिक ग्रंथालये प्रस्थापित करणे. सार्वजनिक ग्रंथालयामध्ये उपलब्ध जुने व दुर्मिळ ग्रंथ, नियतकालिके, हस्तलिखिते यांचा संग्रह जतन करण्यासाठी प्रयत्न करणे. ग्रंथालय विभागाचा वार्षिक अहवाल दरवर्षी राज्य ग्रंथालय परिषदेच्या मान्यतेनंतर शासनास सादर करणे, सार्वजनिक ग्रंथालये, ग्रंथालय संघ यांना शासन मान्यता व तदर्थ, परिरक्षण, साधनसामग्री व अन्य सहाय्यक अनुदाने ग्रंथालय निधीतून मंजूर करणे असे सार्वजनिक ग्रंथालयाच्या विकासाची कार्य ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून शासन करत असते.


वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये मोठ्या आत्मीयतेने करत आहेत. शासनाने त्यांना आणखी उभारी आणि प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालये सक्षम करावेत.सार्वजनिक ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ पुस्तके आणि महत्वपूर्ण वाचनिय साहित्याचे डिजिटाजेशन करून वाचकांना ऑनलाईन उपलब्ध करून दिले पाहिजे. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयातील वाचक संख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रश्न आणि समस्या शासनाने आद्यापही पूर्णपणे सोडविले नसल्यामुळे ग्रंथालयांची अवस्था वाईट झाली आहे. शासन राज्यातील सर्वच सार्वजनिक ग्रंथालयांना अनुदान देत नाही. ज्यांना दिले जाते ते अत्यंत तुटपुंजे आहे.कर्मचारी-वेतनाबरोबरच त्यांच्या सेवा-शाश्वतींचाही प्रश्न आहे. सेवेचे फायदे कर्मचा-र्यांना मिळणे बाबत शासकीय धोरण निश्चित नाही. केवळ समित्या नेमून आणि त्यांचे अहवाल देऊन प्रश्न सुटणार नाहीत. काळानुरूप ग्रंथालय कायद्यात सुधारणा व नवीन बदल होणे आवश्यक आहे. सार्वजनिक ग्रंथालयांचे भवितव्य केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून असता कामा नये. त्यावर वेगळा उपाय करता येईल का, यावरही विचार झाला पाहिजे.

सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील ग्रंथालय सेवकांना वेतनश्रेणी, सेवानिश्चिती, सेवासुरक्षा, रजानियम, सेवानिवृतीवेतन, शैक्षणिक पात्रता यापैकी कोणत्याही बाबी निश्चित नाहीत. तसेच सार्वजनिक ग्रंथालये ही अत्यावश्यक सेवा मानण्यात येत नसल्यामुळे केवळ वाढती महागाई,वाचनसाहित्याच्या खर्चात झालेली वाढ, वीजदरात झालेली वाढ, यांचा विचार करून या ग्रंथालयाचे अनुदान १९७० पासून  वाढवून देण्यात येत आहे. सार्वजनिक ग्रंथालये आपला खर्च सभासद वर्गणी, देणग्या, रद्दी विक्री. इत्यादी मार्गांनी उपलब्ध उत्पन्नावर भागवत असतात. ग्रंथालय सेवकांचे प्रश्न गेल्या ४५ वर्षापासून प्रलंबित आहेत. ग्रंथालय सेवकांच्या जिवावर ग्रंथालय चालते, त्यांना पुरेसे वेतन दिल्याशिवाय ग्रंथालये समृद्ध होणार नाहीत. निष्ठेने काम करणारा सेवकवर्ग मिळ्ण्यासाठी शासनाने ग्रंथालय सेवकांची वेतनश्रेणी ठरवायला हवी. ग्रंथालय सेवक हा सर्वाधिक पीडित वर्ग आहे. तुटपुंज्या पगारावर काम करताना, त्यांच्याकडून पंचतारांकित सेवांची अपेक्षा केली जाते. ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम त्यानं पूर्ण करायला हवा, ग्रंथाचे आवश्यक गरजा भागविता येतील इतपत किमान गरजेएवढा पगार तरी मिळायला हवा.


सार्वजनिक ग्रंथालयाने आपल्या सेवा पुस्तके वाचण्यापुरत्याच मर्यादित न ठेवता गावागावातील माहितीकेंदे म्हणून कार्य केले पाहिजे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये त्याग,प्रेरणा, मूल्यव्यवस्था, व्यावसायिकता आणि सामाजिक बांधलकीची भावना निर्माण व्हावीयासाठी संस्कारकेंद्र म्हणून उपक्रम राबवावेत.विद्यार्थीना केंदबिंदू मानून त्यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकासाच्या योजनाचे आयोजन केले पाहिजे.आजच्या या स्पर्धात्मक युगात ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्याना एमपीएससी, युपीएससीद्वारे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षा ज्याद्वारे भारत आणि महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवांमध्ये अधिकारी निवडले जातात. या स्पर्धा परीक्षांविषयी विद्यार्थांमध्ये जाणीव आणि जागृती निर्माण करून देण्याचे प्रयत्न करावेत. गावातील शेतकऱ्यांना नवनवीन माहिती, तंत्रज्ञान, शेतमालाचे भाव वाचनालयाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सार्वजनिक वाचनालये  सांस्कृतिक केंद म्हणून विकसित केली पाहिजेत. सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास करण्यासाठी त्यांना   शासनाने प्रोत्साहन दिले पाहिजे.सार्वजनिक ग्रंथालयाच्या सेवा प्रभावी आणि गुणात्मक दृष्टीने सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी ग्रंथालायाच्या संगणकीरण केले पाहिजे.त्यानुसार ग्रंथालय कायद्यात आमूलाग्र बदल केले पाहिजेत., तसेच प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचीसुद्धा गरज आहे. त्यासाठी ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन देणे गरजेचे व आवश्यक आहे. त्यांना संगणक प्रशिक्षण व ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण द्यावे. तसेच यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांना आवश्यक ती जागा उपलब्थ करून देण्यात यावी. शैक्षणिक तसेच संदर्भग्रंथ व इतर आवश्यक वाचनसाहित्य उपलब्ध करून द्यावे.प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध करून देणे. इतर आवश्यक व सेवासुविधा ग्रंथालयांना पुरवणे आवश्यक आहे.

आजच्या आधुनिक युगात ग्रंथ वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. पण आजच्या धकाधकीच्या आणि संस्कार विसरत चालेल्या पिढीने ग्रंथ वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक ग्रंथालयाने सर्वोत्तपरीने लोकांना ग्रंथ वाचण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. तरच देशाचा सर्वांगीण विकाससह सार्वजनिक ग्रंथालयाचा विकास होईल.



लेखक 


चंद्रकांत नांगरे आणि सखाराम हारकळ

हिंगोली

No comments:

Post a Comment