Friday 7 May 2021

आई.... सूर्याच्या तेजस्वीतेचे प्रतीक.. !*







*आई.... सूर्याच्या तेजस्वीतेचे प्रतीक.. !*    
                - चंद्रकांत नांगरे 


 *प्रेमस्वरूप आई  ! वात्सल्यसिंधु आई.* 
आईच्या प्रेमाची आणि वात्सल्याची महती कवी माधव ज्युलियन यांनी आपल्या कवितेतून अतिशय सुंदर अश्या शब्दात केली आहे. आई म्हणजे मातृत्वाचा अखंड वाहणारा झरा आणि तीच्या प्रेमाच्या वात्सल्यात आपण दररोजच न्हावून निघत असतो. अश्या या देवतास्वरूप  आईला  माझे कोटी कोटी वंदन..... 

 *आई.... सत्यम, शिवम, सुंदरम* 

आई च्या रूपामध्ये सत्यम शिवम आणि सुंदरम चे दर्शन घडते. सत्यम म्हणजे सत्य हे सत्यच असते. जगात नेहमी सत्याचाच विजय होतो. शिवम म्हणजे कल्याणकारी, शुभ, पवित्र, शांती, सुख, आनंद आणि प्रेम देणारी शक्ती. सुंदरम म्हणजे सर्व प्रकारची सुंदरता.. मनाची, गुणांची  आणि आदराची.. 
  आई नेहमी आपल्याला सत्य बोलायला शिकवते. आपल्यासाठी कल्याणकारी, शुभ आणि मंगलमय अश्याच विचाराची शिदोरी देते आणि आपले मन सुंदर आणि पवित्र ठेवण्यास सांगत असते. म्हणूनच म्हणावसं वाटतं की आई म्हणजे सत्यम, शिवम, सुंदरम चे अनमोल रूप आहे.

*आई… पहिला गुरु आणि मार्गदर्शक* 

आई माझा गुरू : आई माझे कल्पतरू, 
आईचे प्रेम आकाशाहून मोठे 
आणि सागराहूनही खोल आहे.’ असा आईचा गौरव साने गुरुजी यांनी केला आहे.म्हणूनच म्हणतात की आई आपली  प्रथम गुरु असते. ती आपल्याला  बोलायला,  चालायला,  लिहायला आणि वागायला शिकवते . आपल्यावर चांगले संस्कार करून जगण्याची एक दृष्टी देते . एक माणूस म्हणून जगण्याच बळ देते. 
तिच्या संस्कारांतून, तिच्या वागण्या-बोलण्यांतून आणि तिच्या कृतितून आपली जडण - घडण होत असते. माँ जिजाऊने शिवाजी महाराज यांना स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह करण्याचे बीज त्यांच्या आईने रुजवले. विनोबांना  भूदानाची कल्पना त्यांच्या आईच्याच शिकवणुकीतून सुचली होती. आपली आईही आपल्यासाठी प्रेरणादायी स्त्रोत असते. आपली खरी गुरु आणि मार्गदर्शक असते.

 *आई... ईश्वराचे प्रतीक* 

  आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर यांचा देवी साक्षात्कार म्हणजे आई  होय. आई हा शब्दच किती गोड आहे. त्या शब्दात अनमोल असे माधुर्य भरलेले आहे. सारे विश्व या शब्दात सामावलेले दिसत असते . आई हा शब्दातच प्रेम,माया आणि अपार ममता आपणास जाणवतात. जगात ईश्वराचे दुसरे रूप म्हणजे आई असते.*
    'ईश्वर हा प्रत्येक मुलांसोबत राहू शकत नाही म्हणून त्याने आईला बनवलं आहे.' असे म्हटले जाते.आई ही बाळाचे सर्वस्व असते. गर्भात असल्यापासूनच मूल आपल्या मातेवर अवलंबून असते. प्रसूतीच्या मरणप्राय वेदना सहन करून ती आपल्या बाळाला जन्म देते. बाळाला जन्म दिल्यानंतर ती त्याला मायेच्या स्पर्शाने ओंजराते -गोंजारते.  त्यातूनच बाळाला जगण्याची नवी  ऊर्जा मिळते. आईच्या पालन पोषण आणि संस्काराच्या बळावर बाळ लहानांचे मोठे होते.

 *आई... जगण्याचा श्वास* 

आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.* असे 
' *आई* ' या कवितेतून फ. मु. शिंदे यांनी  आईची महान थोरवी  सांगितली आहे. खरंच आई काय असते?  वासराची गाय आणि दुधावरची साय असते. सृष्टीचे सर्वश्रेष्ठ रूप आईला मानले जाते.  जगातील पवित्र, मंगल, उदात्त, भव्य -दिव्य ते  सर्व मातृरूप होऊन प्रकट होते.
लहान मुलांचा श्वास, जगणं आणि सारे विश्वच आई असते. आपल्या मुलांना जरासेही दुःख होऊ नये म्हणून आई जीवाचे रान करत असते आणि तळहातावरील फोडा प्रमाणे आपल्या पिल्ल्याला जपत असते.

 *आई... चंद्राच्या विशाल ह्र्दयाचे प्रतीक* 

हृदयाच्या मखमली पेटीत ठेवण्यासारखी दोनच अक्षरे आहेत; ती म्हणजे आई! जीवनात येणाऱ्या सुखदु:खाच्या फेर्‍यात अडकलेल्या आपल्या बाळाला धीर देण्यासाठी आई चंदनासारखी झिजत असते. 
आईने आपल्या मुलाला  कितीही मारले तरी पुन्हा मूल तिच्याच कुशीत शिरत असते ; कारण आईच्या रागापाठीमागे प्रेमचं  असतं हे त्याला माहीत असतं म्हणूनच साने गुरुजी म्हणतात-
फुलामध्ये फूल। हुंगावे जाईचे
सुख भोगावे आईचे। बालपणी।
माऊली माऊली। कल्पवृक्षाची साऊली
तान्हेबाळा लागी दिली। देवाजीने.
आई आपल्या जीवनाला आकार देते असते. आपल्या अंधकारमय जीवनाला  उजळून प्रकाशमय करत  असते.  आईच चंद्राच्या शीतल हृदयासारखं आपल्याला शीतल छायेत वाढवत असते. 

*आई... निस्सीम प्रेमाची मूर्ती*
 
 आईची महिमा  सांगताना प्रसिद्ध गीतकार शांताराम नांदगावकर म्हणतात, ‘‘माझ्या जीवनात मी आईला ईश्वराचे स्थान देतो.'' आई आपल्या मुलांच्या जीवनाला आकार देणारी वात्सल्यमूर्ती असते. आई कधी रागावते,  मारते पण मुलांच्या कल्याणासाठी अखंड प्रयत्न करत असते.  आईचे प्रेम, तिने केलेले संस्कार, तिच्या शिकवणुकीचे चार शब्द या सार्‍याचा आपल्या जडणघडणीत खुप  मोठा वाटा असतो! ही शिदोरीच आपल्याला जीवनभर  सोबतीला असते. संघर्षाच्या, सुख-दुःखाच्या कसोटीच्या प्रसंगात मोलाची ठरते.आईची माया - ममता आणि प्रेम हे निस्सीम असते

 *आई : वात्सल्याचा झरा* 

आई म्हणजे आपल्यासाठी अखंड वाहणारा  वात्सल्याचा  झरा आहे. साऱ्या विश्वात आई  सर्वात श्रेष्ठ आहे.  आपल्या मुलांवर  बालपणापासूनच योग्य संस्कार देणारी आई जागतील  आपला पहिला गुरु आणि मार्गदर्शक होय.  
आई स्वतः भुकी राहते पण आपल्याला अन्न देते. आई आपल्यासाठी स्वतःचे संपूर्ण जीवन बलिदान करतांना दिसत असते.  आई नेहमीच स्वतः चे सुख दुःख विसरून आपल्याला नेहमी आनंदी ठेवण्याचा सतत प्रयत्न करत असते.
 विनोबा भावेंसारखे थोर देशभक्त आईची महिमा गातांना म्हणतात, की ‘आईची पूजा म्हणजे वात्सलतेने उभ्या राहिलेल्या परमेश्वराची पूजा. आई  म्हणजे निस्सीम सेवेची मूर्ती होय

 *आई... सूर्याचे तेजस्वीता* 

सूर्यकिरणांच्या स्पर्शान कमळं उमलावीत तशी आईच्या वात्सल्यरुपी प्रेमानं बालकाची जीवनकळी उमलत असते.  आकाशाहून अथांग अन् सागराहून विशालतेचे प्रतिक बनून आई आपल्या बालकाला जीवनाचे धडे शिकवित असते . आई आपल्याला बाळाला  संस्काराची शिदोरी जन्मभर देत असते.  जगात त्याला पावलो पावली येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्याची, ध्येय गाठण्याची चिकाटी बाळगण्याची शक्ती देत असते.

*आई... जगण्याच्या लढाईतील महान योद्धा..*
आई आपल्या मुलांवर येणारी हजारो संकटे स्वतः वर घेऊन त्या संकटावर यशस्वी मात करणारी एक महान योद्धा असते. मुलांना संघर्षाच्या मैदानात यशाचा मार्ग दाखवते. विजय मिळवून देते. दुःखाच्या सहवासात देखील आपले  सकारात्मक मनोबल वाढवून दुःखाशी लढायला शिकवते. 
आपल्या पिल्याला पंखाचे पाठबळ देऊन लढाईच्या मैदानात समोर उभी राहणारी आई.. म्हणजे लढाईतील घनघोर यौद्धयासारखी भासते. आपल्या मुलांसाठी जगातील सर्व शक्तीशी लढण्याची शक्ती फक्त आणि फक्त आईच्या सामर्थ्यात असते. म्हणूनच केजीएफ मधील अभिनेता यश म्हणतो की, " *इस दुनिया में सबसे बडा योद्धा माँ होती है I माँ से बडा कोई ताकतवर नही होता है I "*

 *स्वामी तिन्ही जगाचा I आईविना भिकारी* 

आई असे पर्यंत तिची किंमत आपल्याला आणि घरच्यांना देखील कळत नाही पण ती नसली की आपल्या तिची खरी किंमत कळते.तीच्या असण्याचे महत्व कळते. आई नसलेल्या बाळाला विचारा आई नसल्याचे दुःख. आई नाही तर काहीच नाही. हे सारे विश्व स्मशान वाटते. आई नसल्याने अनंत यातना सहन कराव्या लागतात. आई नसल्याचे दुःख व्यक्त करतांना  कवी यशवंत म्हणतात..
आई म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येई कानी। मज होय शोककारी
नोहेची हाक माते। मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी? आई घरी न दारी
ही न्यूनता सुखाची। चित्ती सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा। आईविना भिकारी.
 या जगात आई नसेल तर तिन्ही जगाचा स्वामी देखील भिकाऱ्या सारखा राहण्यास मजबूर होतो. आई नसल्यामुळे बालकांचे सारे जगच करपून जाते. जगातील सारे दुःखे त्याच्या वाट्याला येतात आणि हे सुंदर जीवन नकोसे होते. जीवनचं आळणी होते. 
म्हणून मला म्हणावेसे वाटते की,  
'आई नसते 
 तेंव्हा… 
काहीच नसतं 
आपलं म्हणणार कुणीच नसतं 
प्रेम माया लावणार 
कुणीच मिळत नसतं 
सर्वत्र अंधार पसरतो 
प्रकाश दाखवणार 
कुणीच भेटत नसतं '
  समुद्राचे औदार्य, चंद्राची शीतलता, सूर्याची प्रखरता, पृथ्वीची विशालता यांचा सुरेख संगम म्हणजे आई.आईच्या मायेत स्वर्ग असते म्हणून आपण आपल्या आईची मनोभावे सेवा करावी. 


 *चंद्रकांत नांगरे 
 ग्रंथपाल 
एम. लिब. महा. सेट, पि. एच.डी. (नोंदणी ) ( ग्रंथालय आणि माहितीशास्त्र )
 पोदार इंटरनॅशनल स्कूल, हिंगोली*


*आई मुलांसाठी संस्काराची शिदोरी असते  - प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज* 

मातृदिनाच्या सोहळा ऑनलाईन साजरा 

हिंगोली, दि. 

आई मुलांसाठी संस्काराची शिदोरी असते. आई नावाच्या विद्यापीठातून मुले संस्काराची शिदोरी घेऊन आपल्या जीवन मार्गाचा सुखकर प्रवास सुरु करत असतात. असे प्रतिपादन शाळेचे प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज यांनी केले. 

जागतिक मातृदिनाचा सोहळा पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. त्याला शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या मातांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला.

प्राचार्य संजीव कुमार भारद्वाज पुढे बोलतांना म्हणाले की, 
'आई म्हणजे  प्रेम, काळजी, चिंता, त्याग आणि  शीतलता या गुणांची बरसात आपल्या मुलांवर दिवसरात्र करत असते. 
आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करणारी आई. आपल्या मुलांवर सर्वोत्तम संस्कार आणि उत्तम शिक्षण मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असते. 
या ग्रहावर आई  फक्त एक अशी व्यक्ती आहे जी आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू पाहू इच्छिते. आई आपल्याला  स्वतःवर विश्वास ठेवण्यास शिकवते, आपल्याला सर्वोत्तम कार्य करण्यास प्रोत्साहित करते.

मातृदिनानिमित्त मुलांसाठी विविध ऑनलाईन उपक्रम घेण्यात आले होते. त्यामध्ये मुलांनी आपल्या आईला घरकामात मदत करणे. आईला वृक्षरोप स्नेहभेट म्हणून देणे. आई सोबत कोणत्याही गीतावर नृत्य करणे. आई सोबत गीत गाणे. निर्मळ प्रेमाचे प्रतीक म्हणून फुले भेट देणे. आपल्या आईला स्वतःतयार केलेले ग्रीटिंग कार्ड भेट देणे. अश्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून मातृदिन साजरा करण्यात आला.
कोरोना लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांची शिक्षिका बनून आई आपल्या मुलांचा अभ्यास घेत आहे. मुलांना शाळेत देण्यात आलेले होमवर्क मुलांकडून करवून घेणे, मुलांच्या अभ्यासात मदत करणे. मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करण्यापासूनचे सर्व कार्य आईचं करत असते. म्हणून शाळेकडून देवतुल्य आईचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

मेरी मां प्यारी मां मम्मा 
मेरी मां तुम हो मेरी प्रेरणा 
जीवन की फुलों में 
खुशबू का अहसास हों !
अशी आपल्या प्रेमळ आईची महती व्यक्त करणारी कविता शाळेतील विद्यार्थी आशुतोष तिडके याने केली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले.



No comments:

Post a Comment