Sunday 11 July 2021

मंगेश पाडगावकर

कवितेबद्दल-



मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेल्या कविता या ब्लॉग मध्ये देण्यात आल्या आहेत.

मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी, तसेच कविता माणसांच्या माणसांसाठी या पुस्तकांमधुन घेण्यात आल्या आहेत. 

या सर्व कविता मंगेश पाडगावकर यांच्या आहेत. मंगेश पाडगावकर यांच्या कवितामाणसाला जगायला शिकवतात.

मंगेश पाडगावकरांची एक अप्रतिम कविता

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....!
रिकामं तर रिकामं,
लिहिलं तर छान असतं...!

शेवटचं पान मृत्यू अन् 
पहिलं पान जन्म असतं...!
मधली पाने आपणच भरायची,
कारण ते आपलंच कर्म असतं...!

होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलंच पान कधी गाळायच नसतं....!चूक झाली तरी 
फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच
आपल्याला पुढे शिकायचं असतं.....!

नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे

नशीब कोणी दुसरं लिहित नसतं 
आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी
कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तरशोधण्यासाठी 
जन्माला यायचं असतं

आहात तुम्ही 'सावरायला' 
म्हणुन 'पडायला' आवडते, 
आहात तुम्ही 'हसवायला' म्हणुन
'रडायला' आवडते, आहात तुम्ही 'समजवायला' म्हणुन 
'चुकायला' आवडते,

माझ्या आयुष्यात आहेत तुमच्यासारखे "सगळे ''म्हणुन 
मला "जगायला" आवडत...*

‬: मंगेश पाड़गांवकरांची एक अत्यंत सुंदर अर्थवाही कविता !

*'सा रं का ही स्व तः सा ठी'*

देवधर्म पूजाअर्चा
सारं असतं स्वतःसाठी
देवाला यातलं काही
नको असतं स्वतःसाठी

फुलं अर्पण करतो देवाला
ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून ?
सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा
त्याला काय करायचंय फुलं घेऊन ?

नैवेद्य जो आपण दाखवतो
तो काय देव खातो ?
तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं
भरणपोषण करीत असतो !

निरांजनाच्या इवल्या ज्योतीने
ओवाळतो आपण प्रभूला
चंद्रसूर्य जातीने
हजर ज्याच्या दिमतीला

स्तोत्रं त्याची गातो ती काय
हपापलाय म्हणून स्तुतीला ?
निर्गुण निराकार जो
त्याला अवडंबर हवंय कशाला ?

सारं काही जे करायचं
ते स्वतःसाठीच असतं करायचं ,
प्रार्थनेनं देव बदलत नसतो
स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं !
आवडलेल्या आमटीचा
आवाज करीत मारता भुरका
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

जबरदस्त डुलकी येते
धर्मग्रंथ वाचता वाचता !
लहान बाळासारखे तुम्ही
खुर्चीतच पेंगू लागता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

देवळापुढील रांग टाळून
तुम्ही वेगळी वाट धरता !
गरम कांदाभजी खाऊन
पोटोबाची पूजा करता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

प्रेमाची हाक येते
तुम्ही धुंद साद देता !
कवितेच्या ओळी ऐकून
मनापासून दाद देता !
विश्वास ठेवा यात काही पाप नाही ,
आनंदाने जगायचं नाकारणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही !

-- *मंगेश पाडगावकर*





मराठी कविता - हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो 
मराठी कविता - शहाणपणाचं गाणं
मराठी कविता - आपलं गाणं आपण गावं






 हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो 



हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !


आपलं जे असतं

ते आपलं असतं,

आपलं जे नसतं

ते आपलं नसतं !


हसतं डोळे पुसून

आतून फळासारखा पिकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !


आलेला मोहर 

कधी जळून जातो,

फुलांचा बहर

कधी गळून जातो !


पुन्हा प्रवास सुरु केला

चालून जरी थकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !


कधी आपलं गावसुध्दा

आपलं नसतं,

कधी आपलं नावसुध्दा

आपलं नसतं !


अशा परक्या प्रदेशात

वाट नाही चुकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !


पिंजऱ्यात कोंडून

पाखरं आपली होत नाहीत,

हात बांधून

हात गुंफले जात नाहीत !


हे मला कळलं तेव्हा

हरुनसुध्दा जिंकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !


झाड मुकं दिसलं तरी 

गात असतं,

न दिसणाऱ्या पावसात 

मन न्हात असतं !


काळोखावर चांदण्याची

वेल होऊन झुकलो ;

हे गाणं मी तुझ्याकडून शिकलो !


      - मंगेश पाडगावकर







शहाणपणाचं गाणं


माणसाने शहाण्यासारखं वागावं,

आणि मग जगात आनंदाने जगावं !


वाट इथली बिकट असते

हे काय मला ठाऊक नाही ?

पावलोपावली कटकट असते

हे काय मला ठाऊक नाही ?


ठाऊक आहे म्हणून तर

लागतं हे सागावं :

माणसाने शहाण्यासारखं वागावं,

आणि मग जगात आनंदाने जगावं !


कुठेतरी व्हिस्की झोकून आपण घरी जाणार ! 

प्रश्न आला : आता घरी तोंड कसं देणार ?


अगदी सोपं आहे उत्तर 

आणि तितकंच सरळ उत्तर !


जाताना वाटेत एक 

गजरा घेऊन घरी जायचं ;

दार उघडलं : बोलू नये :

भारावून बघत रहायचं !

भारावलेल्या अशा नजरा,

बोलायचं काम करील गजरा !


प्रश्न सुटला !

बिनदिक्कत गुणगुणत आत जावं !

माणसाने शहाण्यासारखं वागावं,

आणि मग जगात आनंदाने जगावं !


आपण असतो रस्तावर,

चालत असतो, मजेत, थांबून ;

नवी कोरी एक मोटार 

येताना दिसते लांबून !


मोटार चक्क जवळ उभी रहाते !

चालवणारी सुंदर बाई

आपल्याकडे भारावून पहाते !


आपला श्वास एकदम अडतो,

डोक्यामध्ये प्रकाश पडतो !

ही तर होती कॉलेजात आपल्या वर्गात !

गेले ते दिवस

जेव्हा सुखाच्या होतो स्वर्गात ! !


ती खाली उतरणार !

आपण कसे ( अंतर्बाह्य ) फुलून येणार ! !


ती म्हणते : “ बसत नाही माझा विश्वास !” 

त्या क्षणी आपण घ्यायचा दीर्घ श्वास ! !

( तिला ऐकू जाईल या बेताने !)


ती म्हणते : “ युगायुगांनी आपण भेटलो !”

अशा वेळी मुळीच नाही दाखवायचं-

आपण आहोत आतून पेटलो !! 


नुसतं हसून म्हणायचं,

“चहा घ्यायला चलायचं!”


रुबाबाला ( अर्थात तिच्या ) शोभून दिसेल

महागडं हॉटेल असं समोर असेल !!

मागवायचा शामी कबाब,

( मनात म्हणायचं : गेल्या जन्मी होतो नबाब !)

मनात उधळीत फुलपाखरं,

चाखीत चाखीत चहा प्यायचा :

बिल आठवून मुळीसुध्दा 

घाम नाही फुटू घ्यायचा  !!


खाणंपिणं, गप्पागोष्टी मजेत होणार,

अर्थातच, निरोप घ्यायची वेळ येणार !

ती चटकन पर्स आपली उघडणार,

“प्लीज, मी बिल देते” असं म्हणणार!!


प्रश्न आला : अशा वेळी काय करावं ?

( जगावं की मरावं )

या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ सोपं :

तिला बिल भरू द्यावं !!

कोमल कोमल धागे कोणी निर्दयपणे तोडील काय ?

मला सांगा, मैत्रिणीचं मन कोणी मोडील काय ?


आयुष्य ही बासरी असते :

जवळ घेता आली पीहिजे ;

आपलेच ओठ, आपलेच श्वास :

सुरात लावता आली पाहिजे !


गुणगुणत गुणगुणत तरंगत घरी यावं !

माणसाने शहाण्यासारखं वागावं,

आणि मग जगात आनंदाने जगावं !


      - मंगेश पाडगावकर





आपलं गाणं आपण गावं


फिदिफिदि हसतील ते ? 

हसू देत की ! 

बोट मोडीत बसतील ते ? 

बसू देत की ! 


आपणं का शरमून जायचं ? 

कशासाठी वरमून जायचं ? 


तिच्या हातात हात गुंफून आपण जावं,

आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं ! 


दुस्वासाने जळतील ते  ? 

जळू देत की  ! 

कुजकं दळण दळतील ते  ? 

दळू देत की  ! 


आपण कां दबून जायचं  ? 

आयुष्याला उबून जायचं  ? 


फूल घ्यावं तसं तिला जवळ घ्यावं,

आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं  ! 


खोट खोट म्हणतील ते  ? 

म्हणू देत की  ! 

पोट दुखून कण्हतील ते ? 

कण्हू देत की  ! 


आपण कां रडत जायचं  ? 

काळोखात बुडत जायचं  ? 


डोळ्यांनी डोळ्यांतल चांदणं प्यावं,

आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं  ! 


शाप देत जातील ते  ? 

जाऊ देत की  ! 

दात ओठ खातील ते  ? 

खाऊ देत की  ! 


आपण का भिऊन जायचं  ? 

निराशा पिऊन जायचं  ? 


ओठ जुळवून ओठांचं देणं द्यावं, 

आपलं गाणं आपल्यासाठी आपण गावं  ! 


      - मंगेश पाडगावकर

No comments:

Post a Comment