Wednesday 11 August 2021

डॉ. एस आर. रंगनाथन एक जागतिक कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ

डॉ. एस आर. रंगनाथन एक जागतिक कीर्तीचे ग्रंथालय शास्त्रज्ञ
           --सखाराम हारकळ आणि चंद्रकांत नांगरे 







१.ग्रंथ हे उपयोगासाठीच आहेत. २.प्रत्येक वाचकांसाठी ग्रंथ. ३.प्रत्येक ग्रंथासाठी वाचक. ४.वाचक आणि ग्रंथालय कर्मचारी यांच्या वेळेची बचत. ५.ग्रंथालय ही एक वर्धिष्णू संस्था आहे. ही ग्रंथालयशास्त्राची पंचसूत्री मांडून ज्ञानाचा महासागर आणि सर्व क्षेत्रे सर्वसामान्यांसाठी डॉ. एस आर. रंगनाथन यांनी खुली केली. सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच निरंतर शिक्षण देखील आवश्यक असते. याचे महत्व डॉ. रंगनाथन यांनी समाजाला पटवून दिले. त्यासाठी ग्रंथालयाचा विकास झाला पाहिजे आणि प्रसार झाला पाहिजे देशातील सर्वसामान्य जणांसाठी ज्ञानाची दारे विनामूल्य खुली झाली पाहिजे त्याचप्रमाणे वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जनतेने प्रयत्न केले पाहिजे यासाठी आपले उभे आयुष्य खर्च करणारे डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांचा 12 ऑगस्ट हा जन्म दिन संपूर्ण भारतात ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील ग्रंथालय चळवळीची आणि ग्रंथालय शास्त्र शिक्षणाची समृद्धी करण्यामागे डॉ. एस. आर. रंगनाथन यांची भूमिका मोलाची आहे. 12 ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस संपूर्ण भारतात ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने केलेले हितगुज. भारत देश हा प्राचीन काळापासूनच बौद्धिक ज्ञानाचे भांडार म्हणून ओळखला जातो. नालंदा, तक्षशिला, कौशाम्बी, वल्लभी, विक्रमशिला, उज्जैन ही प्राचीन काळातील ग्रंथालये जगप्रसिद्ध आहेत. मात्र आधुनिक काळाचा विचार करता भारत हा पाश्च्यात्याच्या तुलनेत अतिशय मागे राहिला असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. इसवी सन 1800 नंतर खऱ्या अर्थाने भारतात आधुनिक ग्रंथालये आणि ग्रंथालय सेवांची आवश्यकता भासू लागली. इसवी सन 1800 नंतर अनेक घटना घडल्या आहेत त्यांचे खऱ्या अर्थाने त्या घटनांचे ग्रंथालय चळवळीतील योगदान उल्लेखनीय आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉ. मेलविलड्युई, पॉल ऑटलेट, अँथनी पानिझी, एफ. रायडर, जे. एच. शेरा, एच. ए. ब्लिस, सी. ए. कटर,  अँडरसन बर्नाड या पाशात्य आणि पौरात्य देशातील ग्रंथालय तज्ञाचे योगदान उल्लेखनीय आहे तर भारतात सयाजीराव गायकवाड तिसरे, डॉ. एस आर. रंगनाथन, पी. एन. पनिकर, पी. एन. कौला, बी. एस. केशवन यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे, प्रस्तुत प्रकरणात डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे जीवन, शिक्षण, आणि ग्रंथालय चळवळ आणि ग्रंथालयशास्त्राच्या विकासातील योगदान विषयी चर्चा केली आहे. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे कार्य जागतिक स्तरावर परिचित आहे. एकूण 70 पेक्षा अधिक ग्रंथ आणि 3000 पेक्षा अधिक शोध निबंध लिहून ग्रंथालय शास्राचे साहित्य अधिक समृद्ध केले आहे. सन 1957 या वर्षी त्यांच्या कार्याचा गौरव केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून केला आहे. 
डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे जीवन विषयक दोन शब्द: 
डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्म तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील शियाली या गावात 12 ऑगस्ट 1982 या वर्षी झाला. आताचे तामिळनाडू म्हणजेच स्वातंत्र्य पूर्व काळातील मद्रास प्रांत होय. त्यांचे बी. ए. पर्यंतचे शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन महाविद्यालयातून झाले असून ते इंग्रजी विषयातील पदवीधर आहेत. सन 1916 मध्ये गणित या विषयातून त्यांनी एम. ए. ची पदवी प्राप्त केली तदनंतर त्यांनी एल. टी. ही अध्यापन शास्त्रातील पदवी घेतली आणि पुढे त्यांनी सहा वर्षे गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्य केले होते. सन 1924 मध्ये डॉ. रंगनाथन यांची चेन्नई विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून नेमणूक करण्यात आली आणि ग्रंथालय शास्त्राचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी चेन्नई विद्यापीठाने स्वतःच्या खर्चाने ब्रिटन मधील लंडन येथील स्कूल ऑफ लायब्रेरियन शिप मध्ये पाठविण्यात आले होते. तेथे त्यांनी एक वर्षाचा ग्रंथपालन चा अभ्यासक्रम पूर्ण केला व पुन्हा चेन्नई ला परत आले. सन 1925 ते 1945 दरम्यान मद्रास विद्यापीठाचे ग्रंथपाल म्हणून कार्य केले. मद्रास विद्यापीठात कार्यरत असताना त्यांनी ग्रंथालय शास्त्र समृद्ध करण्यासाठी अनेक विषयावरील पुस्तके लिहली आणि अनेक नावीन्य पूर्ण उपक्रम त्या ठिकाणी राबविले होते. 
डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली हे 1945 च्या दरम्यान बनारस विद्यापीठाचे कुलगुरू होते त्यांच्या विनंतीवरून 1945 ते 1946 दरम्यान त्यांनी बनारस विद्यापीठाचे विद्यापीठ ग्रंथपाल म्हणून कार्य केले होते. दिल्ली विद्यापीठामध्ये डॉ. एस. आर. रंगनाथन यांची त्यावेळेसच्या दिल्ली विद्यापीठाचे उपकुलगुरू सर मॉरिस ग्वायीर यांनी रंगनाथन यांची दिल्ली विद्यपीठात ग्रंथालय शास्त्राचे प्राध्यापक आणि सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती. दिल्ली विद्यापीठात रंगनाथन यांनी स्वतंत्र ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विभाग स्थापन केला होता. उज्जैन येथील विक्रम विद्यापीठात 1957 साली स्वतंत्र ग्रंथालयशास्त्र विभाग सुरु केला होता. पुढे 1962 या वर्षी बेंगलोर येथे डॉक्युमेंटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेन्टर सुरु केले आणि शेवटपर्यंत याच संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्य केले होते. सन 1957 साली भारत सरकारने ग्रंथालय समिती स्थापन केली होती तिचे अध्यक्ष म्हणून डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी केले होते. सन 1928 मध्ये त्यांनी मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना करून ग्रंथालय चळवळीला खऱ्या अर्थाने चालना दिली होती. सन 1933 साली त्यांच्या प्रयत्नातून आणि प्रेरणेमुळे आखिल भारतीय ग्रंथालय संघाची स्थापना झाली होती. ते भारतीय ग्रंथालय संघाचे सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते नंतर ते याच संघाचे आजीवन सभासद होते. 
सन 1948 या वर्षी बिटिश कॉन्सिल चे अतिथी म्हणून त्यांनी फ्रांस, हॉलंड, नॉर्वे आणि स्वीडन या युरोपिअन देशांचा आणि 1950 या वर्षी रॉकफेलर फौंडेशन चे अतिथी म्हणून त्यांनी अमेरिका या देशाचा अभ्यास दौरा केला होता आणि इतर पाशात्य आणि पौरात्य देशातील अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अध्ययन करून आपल्या देशातील ग्रंथालय व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या आहेत.
सन 1935 साली त्यांना रावसाहेब या पदवीने गौरवविण्यात आले होते. डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय चळवळ आणि शिक्षणातील कार्याचा सन्मान म्हणून त्यांना 1957 साली पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. सन 1948 या वर्षी दिल्ली विद्यापीठाने आणि 1962 या वर्षी अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठाने डॉ. रंगनाथन यांना द. लिट. पदवी बहाल करून त्यांचा सन्मान केला होता. सन 1970 साली मार्गारेट मान हे पदक बहाल करण्यात आहे होते. त्यांचे ग्रंथालय शास्त्रातील कार्य बघून भारत सरकारने त्यांची ग्रंथालय शास्त्राचे राष्ट्रीय प्राध्यापक म्हणून नेमणूक केली होती.      
ग्रंथालय वर्गीकरण नुसार पुस्तकांची पद्धतशीर मांडणी केली जाते तर तालिका या ग्रंथालयांचा आरसा च असतात, सन 1933 या वर्षी ग्रंथ वर्गीकरणाची द्विबिंदू वर्गीकरण पद्धतीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली तर सन 1934 या वर्षी तालिका संहितेची वर्गीकृत तालिका संहिता ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. सन 1945 मध्ये डिक्शनरी तालिका कोड तयार केले, ग्रंथालयशास्त्रावरील 70 पेक्षा अधिक पुस्तके आणि 3000 पेक्षा अधिक लेख लिहून ग्रंथालय शास्त्र चे साहित्य संपन्न केले, हे कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिशय मौलिक योगदान ठरले. ग्रंथालय शास्त्रात त्यांनी केलेल्या भरीव कामगिरी मुले आज आपणास सुसज्ज ग्रंथालये आणि स्वतंत्र ग्रंथालय विभाग पाहायला मिळतो. त्यांनी ग्रंथालय चळवळ आणि ग्रंथालय शास्त्रात केलेल्या कार्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून संबोधले जाते. दिनांक 27 सप्टेंबर 1972 रोजी बेंगलोर येथे ते कालवश झाले. आज भारतातील अनेक विद्यापीठातून त्यांचे विचार आणि त्यांचे ग्रंथालय चळवळ आणि ग्रंथालयशास्त्रातील योगदान अभ्यासक्रमाच्या द्वारे प्रसारित केले जाते. डॉ. रंगनाथन यांच्या विचाराच्या आधारे ग्रंथालय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी या क्षेत्राला न्याय देणे गरजेचे असून समाज आणि राष्ट्रनिर्माणचे कार्य प्रामाणिक पणे करणे आवश्यक आहे.     
सखाराम हारकळ आणि चंद्रकांत नांगरे, हिंगोली

No comments:

Post a Comment