Thursday 26 May 2022

Articles


माणुसकीचा हरवत चाललेला प्रदेश - चंद्रकांत नांगरे

माणुसकी म्हणजे काय रे भाऊ? कुठे मिळते माणुसकी? अन कशी दिसते माणुसकी? माझं तर डोकचं चालत नाही राव,  या माणुसकीशून्य पिसालेल्या दुनियेत. दररोजचे वर्तमानपत्र उघडले की पानोपानी दिसतात अत्याचार,  हत्या, बलात्कार, अन्याय, भ्रष्टाचार,  लूट, अपघात आणि मारामारी असे बरेच काही. जे पाहूनचं काळीज तुटतं….अंगावर शहारे येतात. डोकं स्तब्ध होते. एवढे कसे निर्दयी लोक जन्माला आले असे वाटते.
माणुसकी म्हणजे माणसाने माणसाची केलेली कदर, समोरच्या व्यक्तीचा आदर. माणसातील माणूस म्हणून केलेली निस्वार्थी मदत. माणुसकी म्हणजे निस्वार्थी प्रेम… अपार प्रेम. खरचं या धावपळीच्या जगात पाहायला मिळते का माणुसकी..? आजकाल समाजामध्ये अस्थिरता, असमाधान, असंतुष्टता आणि अविचार वाढत आहेत.आजच माणूस आत्मकेंद्रीत बनत चालला आहे. तो फक्त स्वतः पुरता विचार करतो. पैशापुढे माणूस माणुसकी हरवून बसला आहे. तो स्वतःच्या सुखाच्या पुढे येणाऱ्या कुठल्याही गोष्टीला नष्ट करण्याचा सपाटा लावतांना दिसत आहे. मग ती गोष्ट स्वतः चे जन्मदाते माय - बाप, भाऊ - बहीण, बायको असो की मुले. स्वतःच्या स्वार्थी सुखासाठी संसारची राखरांगोळी करणारे लाखो लोक आपणास दिसतात.
असंख्य लोकांतील माणुसकीचा हिरवळ प्रदेश हरवत चालला आहे. आजच्या लाखो माणसातील माणुसकी उजाड होत आहे. माणुसकीच्या जागी लोक आपलपोटे, स्वार्थी, भांडखोर नसेबाज, रांडबाज, भोगी आणि हिंसक बनत चालले आहेत .विज्ञानातील प्रगतीमुळे आजकाल प्रत्येक क्षेत्रात यांत्रिकीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे माणूस देखील यंत्रयुगात स्वतःच्या सुखासाठी जास्तीत जास्त यंत्राचा वापर करतांना दिसत आहे.या यंत्र युगात माणूस स्वतः साठी फक्त विचार करत आहे. एकदा मी रस्त्याने जातांना पाहिले की, एक माणूस बैलगाडीतून ऊस घेऊन शहरात विकण्यासाठी आला होता. ऊस विकावे आणि स्वतःला पैसे मिळावेत या उद्देशाने त्याने बैलगाडी मोक्याच्या ठिकाणी तर लावली होती. पण तिथे कुठेही सावली नसल्यामुळे बैल उन्हात भाजत होते. ते मुके जनावर काय करणार बिचारे. मुकाट्याने उभे राहिले होते आणि त्या बैलाचा मालक ऊस विकण्यात मग्न होता. थोडीतरी माणुसकी दाखवून त्याने बैलजोडी सावलीला बांधायला हवी होती. लोक मुक्या प्राण्याप्रती करुणा दाखवतांना दिसत नाहीत. शेतात बैल, गाई, शेळ्या किंवा अन्य पाळीव प्राणी असतात त्यांना बरेचजन सकाळ पासून ते दुपारी दोन - तीन वाजेपर्यंत चारा -पाणी देत नाहीत. मुक्या जीवाला उपाशी ठेवतात. मी ज्या शेतात काम केले त्या शेताचा मालक बैलाला खूप मारायचा.. मार -मारायचा.. विनाकारण बैलाला शिव्या द्यायचा… पण एके दिवशी मी त्याचा शेतात माझे बैल घेऊन नागरनी करण्यासाठी गेलो होतो.. त्याला मी स्पष्टचं सांगितले की माझे माझ्या बैलावर खूप प्रेम आहे. त्यांना मारणे तर सोड त्यांना शिव्या देखील दिलेल्या आपल्याला जमणार नाहीत. माझ्या बैलाबद्दल एक शब्दही बोलायचे नाही.. अन्यथा मी माझे बैल घेऊन जाईन..तो एक शब्दही बोलला नाही.. त्यानंतर कधी भेटला की माझ्या बैलाची चौकशी करत असे.
आजच्या अत्याधुनिक समाजातील आपुलकी, प्रेमभाव, आदर, कणव इत्यादी गोष्टी दुर्मिळ होत चालल्या आहेत. कुणाची कुणाला पर्वा नाही. एकदा आपण घरात गेलो आणि आपल्या घराचा दरवाजा लावून घेतला की आपणाला समाजाचे काही देणं - घेणं नाही, लोक एकमेकांना मारो की कुणी आत्महत्या करो, अत्याचार, अन्याय करो, आपण भले अन आपले काम भले या मानसिक विचाराने ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. आपल्यातीलच एखांदा कोणत्याही संकटात सापडला असेल तर आपण काय करतो त्याला त्या संकटातून वाचवण्याऐवजी त्याला दोष देतो. त्याच्यापासून दुरु जातो.. ही कुठले आपलेपण… कुठली माणुसकी..?
 एखांदया संकटात कुणी सापडले तर त्याला जमेल ती मदत करने सोडा त्याला लुटणारे लोक जास्त भेटतील.. असाच माझा एक अनुभव….याच उन्हाळातील घटना आहे. आम्ही वसमतकडून कुरुंदामार्ग उंबरीफाटा ते हिंगोली या मार्गी प्रथमच येत होतो.आम्हांला घरूनचं निघायलाच थोडा उशीर झाल्यामुळे सायंकाळ होत होती आणि मध्येच आमच्या गाडीचे टायर फुटले त्यामुळे गाडी चालवणे अश्यक झाले.रस्त्याने एकही वाहन दिसत नव्हते की कुणी चिटपाखरू दिसत नव्हते .कुणाच्या मदतीची अपेक्षा करणार.. त्यातच मोबाईल बॅटरी कमी असल्यामुळे बंद पडला. दुष्काळात तेरवा महिना म्हणतात ते असे. आडमार्ग असल्यामुळे मोठी वाहतूकही नव्हती आणि कोणतेही मोठे वाहन येत - जात नव्हते. निर्जन अस्या स्थळी आम्ही अडकून पडलो. कुठे जावे काही कळत नव्हते. रस्त्याने दुचाकीवरील लोक ये - जा करत होते पण कुणी मदत करत नव्हते की माणुसकी म्हणून विचारपुसही करत नव्हते. कोणत्या प्रदेशात राहतो आपण? कुठे आलो आपण? असे अनेक मला प्रश्न पडत होते.मग काय सायंकाळच्या वेळी मी, माझी बायको आणि मुलगी असे तिघे मिळून 4-5 किलोमीटर पायी चालत - चालत कळमनुरी मार्गांवरील उंबरी फाट्यावर आलो. तिथेही पंचर दुरुस्तीचे एकच दुकान आणि तो माणूसही आमच्या गाडीकडे पाहायचे नाव घेत नव्हता. कसे - बसे त्याला बळजबरी आम्ही गाडी चेक करायला लावली तर त्याने टायर फुटल्यामुळे आता मी काहीच करू शकत नाही. गाडी येथेच कुठेतरी ठेवा आणि उद्या सकाळी या असे सांगितले . म्हणजे त्याचे दुकान चालावे तेही त्याच्या सोयीनुसार आणि स्वार्थीपणाने. मी त्याला समजून सांगू लागलो की माझ्या सोबत माझे बायको आणि मुलगी आहे .. संध्याकाळही होत आहे. काहीतरी करून दुसरे टायर आणेपर्यंत थांब पण तो काही थांबायाचे नाव घेत नव्हता..त्याने त्याची दुकान बंद करून तो निघून गेला.आमची पुरती अडचण झाली...आम्ही काही हिंमत हारणारे माणसं नव्हेत.. कुणी स्वार्थीपाई सांगेल ते ऐकणारेही नव्हेत… रात्री उशिरापर्यंत तेथेच थांबून एसटी बसने माझ्या बायको आणि मुलीला हिंगोलीला पाठवून दिले. आणि मग मी थोडावेळ एखांदया पिकअपची वाट पाहू लागलो. काही वेळाने एक पिकअप आली. मी त्या ड्राइव्हरला माझी गाडी हिंगोलीला नेण्याचे भाडे विचारले तर त्याने चक्क 1000/- रुपये सांगिलते. अंधारी रात्र होत होतीचं. अवघ्या 10-12 किलोमीटरचे त्याला नाही हो करत मी 800/- रुपये देऊ केले तेंव्हा तो राजी झाला.म्हणजे संकटात सापडलेल्या मदत करने सोडा त्याला लुटणारे जास्त भेटतात. बरं कसेबसे गाडी हिंगोलीला आणली तर येथे गाडी खाली उतरायला कुणी नाही. मी दोघां - तिघांना गाडी पिकअप मधून खाली उतरण्यासाठी बिलावले तर ते काय म्हणतात आम्हाला. एक - एक दारूची बाटली पाहिजे.. आरे भाऊ फक्त एक मिनिटाच्या मदतीसाठी कुठली ही स्वार्थी अपेक्षा.. कुठे गेली माणुसकी..! बरं फक्त गाडी पिकअप मधून खाली काढायची होती..त्यापैकी एक बिचारा आमची मदत करत होता. तर बाकीचे त्याला मदत करू देण्यास नाकारत होते. म्हणजे स्वतःही मदत करायची नाही आणि दुसऱ्यालाही मदत करू द्यायची नाही.. ही कुठली मानवी वृत्ती… माणुसकी हरवत चाललेला माणूस एक दिवस उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.

आज मानवाने विविध क्षेत्रात देदीप्यमान विकास केलेला आहे. पण हा विकास होत असताना खरंच या माणसाला माणूसपण राहिले आहे का? अमानुष कृत्याचं दर्शन आपल्याला वृत्तपत्र व वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा डोळ्यांसमोर येतं तेव्हा मन अस्वस्थ होते. बलात्कारासारखं निंदनीय कृत्य, स्त्रीयांवरील वाढत चाललेले अत्याचार, माणुसकीच्या नावाला काळीमा फासणार्‍या या सर्व गोष्टी कधी थांबणार आहेत?
आजच्या माणसातील माणुसकीचा लोप होतांना दिसत आहे. खराखुरा माणूस अस्तंगत होत आहे. आता उरला आहे तो माणसाच्या रूपात दानव. प्रत्येक क्षेत्रात, परिसरात, कुटुंबात, प्रत्येकाला परिचय द्यावा लागतो की मी डॉक्टर आहे, मी शिक्षक आहे, मी नेता आहे, मी इंजिनीअर आहे, काय गरज आहे आपली स्वतःची तशी ओळख करून द्यायची? स्वतः ची ओळख एक चांगला माणूस म्हणून करून दिली पाहिजे.
  दवाखान्यात गरीब रोगी उपचारासाठी जात असतात . पैसे कमी असल्यामुळे डॉक्टर त्याला, पैशाची व्यवस्था करा नंतरच ऑपरेशन होईल म्हणून सांगतात . पण, गरिबीने त्रस्त झालेला माणूस पैशा आणणार तरी कुठून? पैशाची अडचण असल्यामुळे योग्य उपचार वेळीच न मिळाल्यामुळे अनेकजण जीव सोडतात. हे आपण कोरोना काळात पाहिले आहे.
शासन चांगल्या योजना प्रत्येकासाठी राबवित असते. पण, त्या योजनाला कुयोजना करण्याचे कार्य कोण करतो, कशासाठी? तर थोड्या पैशासाठी, स्वार्थासाठी. त्या योजना जणमाणसा पर्यत पोहचू देत नाहीत. स्वतःला मूल व्हावे म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी निष्पाप बालकांचे बळी देणारे कोण आहेत. माणसचं की एखांदे प्राणी आहेत.? आपला बचाव व्हावा यासाठी दुसर्‍याला बदनाम करणारे लोक स्वतःच्या स्वार्थी मेंदूपायी दुसऱ्याचे घर जळतात. दुसऱ्याचा छळ छळ करून त्रास देतात.

  आजच्या विज्ञान युगात सत्ता स्पर्धेच्या लोभापायी माणूस अण्वस्त्रासारख्या महाभयंकर अस्त्राची निर्मिती करून क्षणार्धात संहार करून निरपराध लोकांची हत्या करतात . कितीके प्रदेश नष्ट करतात . ताजे उदाहरण म्हणजे रशिया आणि युक्रेन युद्ध… तीन - चार महिन्यापासून महाभयंकर युद्ध सुरु आहे. कोणतेही राष्ट्र माघार घ्यायला तयार नाही. त्या दोघांतील युद्ध सोडवायला अन्य दुसरे कोणतेही राष्ट्र मदत करत नाही. उलट आणखी मोठे युद्ध व्हावे यासाठी प्रयत्न करतांना दिसत आहेत. अश्या माणुसकीशून्य जगात आपण स्वतःला हरवून बसलो आहेत.
म्हणून तर आज खरी गरज आहे माणसातल्या माणुसकीचा शोध घेण्याची. माणूस म्हणून माणुसकी जपावी लागेल नाहीतर सर्व माणसांचा विनाश अटळ आहे.

चंद्रकांत नांगरे
ग्रंथपाल
पोदार इंटरनॅशनल स्कूल, हिंगोली.

No comments:

Post a Comment