Wednesday 28 April 2021

कविता

आई म्हणोनी कोणी - यशवंत

ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.
चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई
शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’
ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’
आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे
गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला
येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे



आई - कविवर्य श्री. फ. मु. शिंदे

आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं!

सर्वांत असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच तरीही नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पालं उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात

आई मनामनात तशीच जाते ठेवून काही
जिवाचं जिवालाच कळावं असं जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दावणारी समईतली जागा

घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान

पिकं येतात जातात
माती मात्र व्याकुळच तिची कधीच भागत नाही तहान
दिसत नसलं डोळ्यांना तरी
खोदत गेलो खोल खोल की सापडतेच अंतःकरणातली खाण

याहून का निराळी असते आई?
ती घरात नाही तर मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गायी?

आई खरंच काय असते?
लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!




हंबरून वासराले चाटती जवा गाय  - नारायण सुर्वे 

हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय

आया बाया सांगत होत्या होतो जवा तान्हा
दुष्काळात मायचा माझा आटला होता पान्हा
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले … 

काट्याकुट्या वेचायला माय जायी रानी
पायात नसे वहांन तिच्या फिरे अनवाणी
काट्याकुट्यालाही तिचं मानत नसे पाय
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले … 

बाप माझा रोज लावी मायच्या मागं टुमनं
बस झाला शिक्षान आता घेऊदी हाती रूमनं
शिकून शानं कुठं मोटा मास्तर होणार हाय
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले … 

दारू पिऊन माये मारी जवा माझा बाप
थर थर कापे अन लागे तिले धाप
कसायाच्या दावणीला बांधली जसी गाय
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले … 

बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी
सांग म्हणे राजा तुजी कवा येईल राणी
भरल्या डोळ्यान कधी पाहीन दुधावरची साय
तवा मले सायीमंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले … 

म्हणून म्हनतो आनंदानं भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जल्म घेवा माये तुझ्या पोटी
तुझ्या चरणी ठेवून माथा धरावं तुजं पाय
तवा मले पायामंदी दिसती माझी माय
हंबरून वासराले … 


असे जगावे   -  विदा करंदीकर 

असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

नको गुलामी नक्षत्रांची भिती आंधळी ता-यांची
आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची
असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

पाय असावे जमीनीवरती कवेत अंबर घेताना
हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना
संकटासही ठणकावुनी सांगावे ये आता बेहत्तर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर

करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जाताना
गहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट घेताना
स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर
नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर


उषःकाल होता होता, काळरात्र झाली -  सुरेश भट्ट 

उषःकाल होता होता, काळरात्र झाली 
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमची आठवण
कोणीतरी काढतंच ना?
ऊन ऊन दोन घास
तुम्च्यासाठी वाढतंच ना?
शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं
तुम्हीचं ठरवा!

कळ्याकुट्ट कळोखात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
दीवा घेऊन उभं असतं
कळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायात काटे रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
आणि फ़ुलं फ़ुलुन येतात
हे काय खरं नसतं?
काट्यांसारखं सलायचं की फ़ुलांसारखं फ़ुलायचं
तुम्हीचं ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस जगायचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

– मंगेश पाडगांवकर

No comments:

Post a Comment