Friday 14 May 2021

कुटुंब :जीवनरुपी वृक्षाचा आधारस्तंभ

कुटूंब : जीवनरुपी वृक्षाचा आधारस्तंभ 
(आपले कुटुंब आपली खरी संपत्ती )
                                    -- चंद्रकांत नांगरे 

'आपल्या कुटुंबासोबत पृथ्वीवर सुंदर जीवनाचा आनंद घ्या.' असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात.जगातील सर्वात मोठा आनंद कुटूंबातील सदस्या सोबत राहून एकमेकांवर प्रेम करण्यात आहे. आपल्या कुटूंबातील सर्वच सदस्य आपल्यावर निस्सीम प्रेम करतात. नि:स्वार्थ भावनेने मदत करतात. मार्गदर्शन करतात आणि आपल्याला जीवनात यश मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. खरंच कुटुंब म्हणजे आपल्यासाठी आपले जग असते.
युनायटेड नेशन्सने  १५ मे, १९९४ मध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा केला होता. कुटूंबाप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे या उद्देशाने जागतिक कुटुंब दिवस साजरा करण्यात येतो. अमेरिकन सामाजिक कार्यकर्ती लिंडा ग्रोवर यांनी 'सिटीजन्स फॉर ग्लोबल सोल्युशन' या चळवळीद्वारे जागतिक कुटुंब दिनाचा जगभर प्रसार आणि प्रचार केला. 'एकत्र या, संवाद साधा, प्रोत्साहन द्या, संपर्क साधा' हे त्यांच्या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट होती.आज 15 मे रोजी  सर्व जगभरात जागतिक कुटूंब दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. भारतातही तेवढ्याच उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येत असतो.
भारत हा कुटुंबवत्सल असा देश आहे. वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, ही आपली भारतीय संस्कृती आजही जपली जात आहे. कुटूंब म्हणजे घरातील सर्वांसाठी नाजूक धागा असतो. तो धागा प्रेम, माया, ममता, त्याग, विश्वास आणि आपुलकीच्या नात्याने घट्ट बांधला जात असतो. कुटूंब म्हणजे पहिली शाळा असते. जिथे जीवनातील सर्व गोष्टी शिकायला मिळतात. अनुभव, मार्गदर्शन, आधार, प्रेम, आदर,मान -सन्मान  यासह सर्वात  महत्त्वाचे सुसंस्कार मिळतात. 
'घर असावे घरासारखे 
नकोत नुसत्या भिंती 
इथे असावा प्रेम जिव्हाळा 
नकोत नुसती नाती '  या कवितेतून कवीने घरात घरपण ,  प्रेम आणि जिव्हाळा असेल तरच ते खरे घर असते असे म्हटले आहे. घराला घरपण, प्रेम आणि जिव्हाळा हे कुटूंबातील सदस्य देत असतात. कुटूंबातील बाबा नेहमीच मौल्यवान सल्ला देत असतात. आई आपल्यावर निस्सीम प्रेम आणि माया लावत असते. बहीण आणि भाऊ आपले शुभचिंतक बनून आपल्याला कल्याणकारी मार्ग दाखवत असतात. आजी -आजोबा म्हणजे घरातील संस्कारकेंद्र असतात. ते आपल्याला नेहमीच चांगले संस्कार देत असतात. कुटूंबातील प्रत्येक सदस्य एकमेकांनावर जीवतोडून प्रेम करत असतो. म्हणूनच म्हटले जाते की 'कुटूंब हे झाडासारखं असत ते कडक उन्हातही आपल्याला थंडगार सावली देत. त्याप्रमाणे कुटूंब आपल्याला प्रत्येक वेळी लाख मोलाचे मार्गदर्शन तर देतेच शिवाय आपल्या सोबत कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये ठामपणे उभे राहते. 
'कुटुंब ही अशी जागा आहे जिथे देशाला आशा मिळते आणि जिथे स्वप्नांना पंख मिळतात. ' असे जॉर्ज डब्ल्यू बुश म्हणतात. कुटुंबामधील  सदस्य  स्वप्नांना बळ देऊन ते साकार करण्याची शक्ती देत असतात.भारतीय कुटूंब पद्धती ही महान आणि मौल्यवान असा सांस्कृतिक ठेवा आपल्या सदस्यांना प्रदान करत असते. भारतीय कुटुंब व्यवस्था समृद्ध आणि आदर्श मानली जाते. पण सध्याच्या अत्याधुनिक आणि भौतिकसोयीयुक्त काळात कुटुंब व्यवस्थेला तडे जात आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब पद्धती उदयास येत आहे. विभक्त कुटूंबात आई -बाबा आणि त्यांची मुले एवढेच राहतात. कुटूंबामध्ये सर्वांनाच भावनिक, शारीरिक, वैचारिक आणि बौद्धिक पातळीवर सर्वच बाबतीत सहकार्य आणि मदत मिळत असते. आपण केलेल्या कार्याचे आई -बाबापासून सर्वंच कौतुक करतात. त्यामुळे जगण्याला नवा उत्साह, नवी ऊर्जा आणि बळ मिळते. पण वाढते शहरीकरण, नोकरी, धंदा, व्यवसायाचे बदलते रूप यामुळे विभक्त कुटुंब पद्धती उदयास येत आहे . विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये शिस्त, कर्तव्याची जाणीव, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकीची शिकवण आणि एकमेकांवरील जीवापाड प्रेम काळानुसार कमी होत आहे. त्यामुळे विभक्त कुटूंबातील सदस्य एकाकी, हताश, एकलकोंडे, निराश आणि हतबल होताना दिसत आहेत. त्यातच एकमेकांचे सहकार्य आणि समजूतदारपणाचा अभाव यामुळे नात्यात दुरावा निर्माण होत आहेत. 
कुटूंब जीवनरुपी वृक्षाचा आधारस्तंभ असतो. कुटूंब समाजातील मूलभूत संस्था आहे. सुसंवाद आणि एकमेकांवर प्रेम असणारे कुटुंब प्रत्येक गोष्टीत यशस्वी होत असते. विठ्ठल महादू खंदारे यांच्या कुटूंबाने माझ्या बालपणीच्या काळात मला भक्कम आधार,  माया, ममत्व आणि प्रेम दिले. त्यामुळेचं मी आज या जगात जिवंत आहे. आईचा माझ्या बालपणीच मृत्यु झाल्यामुळे मी पोरखा झालो. माझे वडील आणि अन्य कुणीही माझा सांभाळ करण्यास तयार नव्हते. मला सर्वांनी वाऱ्यावर सोडले होते. खायला अन्न नाही की राहायला घर नाही. माझ्या हाल -अपेष्टा पाहून माझ्या आईच्या कुटूंबाला माझी दया आली. त्यांनी माझा सांभाळ करण्याचे ठरवले. त्यांनी मला त्यांच्या घरी घेऊन गेले. मला प्रेम, माया -ममता, आधार,  आणि शिक्षण देऊन जीवनात जगण्याची उमेद दिली. जगण्याची ऊर्जा दिली. त्यांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. आदर, प्रेम, माया -ममता, विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकीने ओतप्रोत भरलेले कुटुंब म्हणून विठ्ठल खंदारे यांचे कुटुंब आजही लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. असे प्रेमाने भरलेली करोडो कुटूंबे  आजही भारतात आहेत. म्हणूनच म्हटले जाते की, 'कुटुंब हे सुरक्षा कवचाप्रमाणे असते , कुटूंबामध्ये राहून व्यक्तीला सुरक्षा आणि शांततेचा अनुभव येतो. आपली खरी शक्ती आपलं कुटुंब असते. '
कोरोना विषाणूच्या महामारीने सर्व जगात धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र मृत्युचे तांडव सुरु आहे. चिंताग्रस्त आणि भयावह वातावरण निर्माण झाले आहे. भारतासह जगात लाखो लोक कोरोनामुळे मृत्यु होत आहे. आपली माणसे आपल्या डोळ्यासमोर तडफडून जीव सोडून देत आहेत. अश्या भयावह परिस्थितीमध्ये आपल्याला भक्कम आणि मजबूत अशा पाठींबा फक्त आणि फक्त कुटूंबातील सदस्य देऊ शकतात याची जाणीव आता सर्वांच होऊ लागली आहे. म्हणूनच लोक आपल्या कुटूंबाची काळजी करू लागली आहेत. मागील वर्षांपासून लोक कुटूंबात लॉकडाऊनच्या सावटाखाली एकत्र राहत आहेत. लोकांना आता कुटूंबाचे आणि कुटूंबातील सदस्याचे महत्व कळत आहे. आपल्या कुटूंबातील सदस्याला कोरोना झाला तर  जीवाचे रान करून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याची साथ सोडत नाहीत, त्याला जगण्याची हिम्मत देतात, कोरोना विरुद्ध लढण्याचं बळ देतात. प्रसंगी आपल्या तोंडाने त्याला प्राणवायू देतात आणि आपल्या कुटूंबातील सदस्यांची सर्वोतपरी काळजी घेतली जाते. कुटूंबाचे महत्व ओळखून महाराष्ट्र शासनाने 'माझे कुटुंब माझी जबाबदारी ' या उपक्रमाची सुरुवात केली आहे. आपल्या कुटूंबातील सदस्यांना कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. 
कोरोना विषाणूने जगाला दाखवून दिले की आपले कुटुंब आपल्याला भक्कम आधार देते. जगण्याचं बळ देते. कुटूंबात प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकी ठेवून सर्वांशी प्रेमाने राहावे. तरच जगात शांतता, प्रेम आणि आपुलकीची जोपासना होईल. 

चंद्रकांत नांगरे 
ग्रंथपाल 
पोदार इंटरनॅशनल स्कूल, हिंगोली

No comments:

Post a Comment