Sunday 20 June 2021

चला मुलांनो.. पुस्तके वाचूया आणि जीवन घडवूया...

चला मुलांनो.. पुस्तके वाचूया आणि जीवन घडवूया...     -चंद्रकांत नांगरे 

देशातील प्रत्येक नागरीकाने ग्रंथाचे वाचन केले पाहिजे . दर्जेदार आणि चांगल्या ग्रंथ वाचनाने सुसंस्कारशील जीवन जगण्याचे ज्ञान मिळते . नागरीकांच्या संस्कारशील  आणि  सदाचारी आचरणातून देशाचा सर्वांगीण विकास होत असतो . श्री. पी.एन .पैनीकर यांनी 'Read and Grow' हा   ग्रंथ वाचन करण्याचा संदेश देऊन लाखो लोकांना ग्रंथ वाचण्यास प्रेरित केले .त्यांचा स्मृतीदिन 19 जून हा दिवस भारतात राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . 

ग्रंथ संस्काराची खाण I  ग्रंथ जीवनाचा प्राण II 
ग्रंथ सांगती ज्ञान I विश्वासाठी II 
ग्रंथ युगाची भाषा I ग्रंथ हातावरची रेषा II 
ग्रंथ दाखवतो दिशा I अंधारातही II 
 ग्रंथ वाचनाचे महत्व सांगणारी अशी रचना प्रा. विलास वैद्य यांनी अत्यंत समर्पक शब्दात केली आहे. ग्रंथातून मिळणारे ज्ञान आपल्या अंधाऱ्या जीवनाला  प्रकाशमय करते म्हणून विद्यार्थ्यांनी ग्रंथ वाचन आवर्जून केले पाहिजे. 

 'मानवी जीवनात ज्ञान, शिक्षण आणि संस्कृती विषयक मूल्यांचा प्रसार करणाऱ्या साधनात ग्रंथ अग्रेसर आहेत. व्यक्तीचे जीवन समृध्द करण्यात व देशाचा विकास साधण्यात त्यांचा सहभाग असतो. ' असे ग्रंथाबाबत युनेस्कोने म्हटले आहे. युनेस्कोने वाचनवृद्धी आणि वाचन संवर्धनासह वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यात मौलाचे कार्य केले आहे.

 आजच्या स्पर्धेच्या आणि अत्याधुनिक युगात देखील ग्रंथाचे महत्व अनन्यसाधारण आहे.  आयुष्यातील यशाचा मार्ग ग्रंथ वाचनातूनच जात असतो. जीवनात ग्रंथ वाचनामुळे नव- नवीन आणि सर्वोत्तम मार्ग दिसतात. नकारात्मकतेकडून सकारात्मक जीवन जगण्याची दिशा मिळते. ग्रंथातूनच जीवनात मोठा आधार आणि  मनोबल मिळते.  ग्रंथच आपल्या जीवनाचे खरे मित्र असतात. ते आपल्याला सदैव साथ देतात. मार्गदर्शन करतात. जीवनात यशाची गुढी उभारण्यास मदत करतात. जीवनाला वैचारिक पाठबळ देतात आणि या धावत्या जगात कसे जगायचे ते शिकवतात. ग्रंथ हे प्राणवायू  प्रमाणे आपल्याला क्षणा-  क्षणाला साथ देतात आणि जीवनातील मर्म सांगतात. म्हणूनच बालकांनो.. चला पुस्तके वाचूया आणि जीवन घडवूया.

 शाळा ही सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडवणारी एक संस्कारशील सामाजिक संस्था म्हणून कार्य करत असते. जीवनात कसे वागावे, चालावे आणि बोलावे या शिष्टाचाराचे शिक्षण विद्यार्थ्यांना शाळेतूनच मिळत असते.  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, उच्चं शिक्षणाची आणि 21व्या शतकातील सक्षम नागरिक घडवणारी कला कौशल्य गुण शालेय शिक्षणातूनच मिळत असतात . विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांसह जीवन घडवणाऱ्या साहित्यिक पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे ग्रंथ असून ग्रंथ वाचनामुळे ज्ञानात भर पडते.वाचनामुळे शब्द संपत्ती वाढते.शब्द संपत्तीचा  उपयोग निबंध, लेखन आणि भाषणामध्ये करता येतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व फुलण्यास मदत होते. तसेच ग्रंथ वाचनातूनच  लेखकांच्या कथा, कादंबऱ्या,  लेख आणि कविता यांची  माहिती मिळून जीवन जगण्याचे  जीवनामृत मिळते.
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात की, 'एक पुस्तक शंभर मित्रा समान असते.' आपले खरे मित्र जसे आपल्याला सदैव साथ देतात त्याप्रमाणे पुस्तके हे जीवनाचा मार्ग दाखवून आपल्याला सदैव साथ देतात, मदत करतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो पुस्तकांचे वाचन करून स्वतःचे जीवन घडवावे. विद्यार्थ्यांनी स्वतःला ज्ञान मिळवण्यासाठी,  जगात घडणाऱ्या दैनंदिन घडामोडीची माहिती मिळवण्यासाठी, योग्य मार्गदर्शन, संस्कारशील शिक्षण घेण्यासाठी, महापुरुषाच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेण्यासाठी,  आणि स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी  पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. 
'Reading makes a man perfect 'असे फ्रांसिस बेकन या प्रख्यात विचारवंताने म्हटले आहे. पुस्तक वाचनाने मनुष्य परिपूर्ण होतो.वाचन ही आजच्या काळाची खरी गरज आहे. ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण होत आहे. आज ज्ञान ही शक्ती म्हणून उदयास येत आहे. बालकांनी स्वतःला वाचनाचा छंद लावून संस्कारशील आणि ज्ञान वृद्धिंगत करणाऱ्या पुस्तकांचे  वाचन करावे. 
बालकांनी बोधकथा, पक्षी आणि प्राणी या विषयावरील चित्ररूप पुस्तके, छान छान गोष्टी, थोर महापुरुषांच्या बालपणीच्या आठवणीचे पुस्तके वाचावीत. तसेच मुलांनी छोटी छोटी पुस्तके, मनोरंजन, चरित्र, बालकथा, बालसाहित्य, नीतीकथा, भारतीय लोककथा, नीतिमत्तेच्या कथा, इसापनीती, अनमोल गोष्टी,अकबर आणि बिरबलच्या गोष्टी, अरेबियन बालकथा, तेनालीरामच्या गोष्टी अश्या बालसाहित्याचे वाचन केले पाहिजे. 
शिक्षण हा विद्यार्थी जीवनाचा अविभाज्य अंग असून ग्रंथ हे ह्र्दय आहे. भाषेच्या आकलनासाठी, उच्चार, व्याकरण, संदर्भ, अर्थ, ध्वनी आणि उत्तम संभाषण कौशल्य विकसित करण्यासाठी मुलांनी पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. मोठ्या मुलांनी शैक्षणिक, वैचारिक, जीवन चरित्र, संस्कारमय, बोधप्रत, धार्मिक, सुसंस्कारी  प्रेरणादायी देणाऱ्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, केशवसुत, बा. सी. मर्ढेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, ग्रेस, बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, इंदिरा संत, नारायण सुर्वे, विठ्ठल वाघ, नामदेव ढसाळ, वसंत आबाजी डहाके, फ.मु. शिंदे, जगदीश कदम, इंद्रजित भालेराव, प्रा. विलास वैद्य, अशोक अर्धापूरकर या सारख्या कवी आणि साहित्यकारांच्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी  वाचन केले पाहिजे. 
शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सयाजीराव गायकवाड, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरु यापासून ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, विक्रम साराभाई तसेच विल्यम शेक्सपियर,  डॉ. वर्गीस कुरियन,  डॉ.कार्व्हर, जॉर्जबुश  वाशिंग्टन,बुकर टि. वाशिंग्टन,  अब्राहम लिंकन,  बराक ओबामा, चेतन भगत, अरविंद अडिगा, तस्लिमा नसरीन,  यांच्यापासून ते आजच्या काळातील प्रसिद्ध राजकारणी, वैज्ञानिक, उदयोजक, डॉक्टर आणि शिक्षक यांच्या जीवनचरित्रात्मक पुस्तकांसह त्यांच्या वैचारिक पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. 

विद्यार्थ्यांनी दर्जेदार आणि प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करावे.  यश तुमच्या हातात -शिव खेरा,  यु कॅन वीन -शिव खेरा, जगा पण सन्मानाने -शिव खेरा, एक होता कार्व्हर -वीणा गवाणकर, 
अग्निपंख -अब्दुल कमाल, खरे खुरे आयडॉल -युनिक फीचर्स, किमयागार - अच्युत गोडबोले,  स्टीव्ह जॉब्स -अच्युत गोडबोले आणि  प्रज्वलीत मने -डॉ. कलाम यासारखी प्रेरणादायी पुस्तकांचे विद्यार्थ्यांनी वाचन करावे. 

'वाचाल तर वाचाल ' असे ग्रंथ वाचनाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यांनी ग्रंथासाठी घर बांधले आणि त्यात जवळपास बावीस हजारापेक्षा जास्त ग्रंथाचा संग्रह केला होता. त्यांना बालपणापासूनच ग्रंथवाचनाची अत्यंत आवड होती. ते बालपणापासूनच विविध विषयावरील ग्रंथाचे बारकाईने वाचन करत असत. परदेशात शिक्षण घेत असतांना ते ग्रंथालयात जाऊन ग्रंथालय बंद होईपर्यंत ग्रंथाचे वाचन करत असत. एकदा ते म्हणाले होते की, ' तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एका रुपयाची भाकरी घ्या आणि एका रुपयाचे पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचे ते शिकवेल. '
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापुरुषाकडून पुस्तक वाचनाची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करून आपले जीवन समृध्द करावे. 


 चंद्रकांत गौतम नांगरे 
 ग्रंथपाल 
पोदार इंटरनॅशनल स्कूल, हिंगोली

No comments:

Post a Comment